मधमाश्यांचा इतिहास हा मानवापेक्षा खूप जूना आहे. मानव पृथ्वीवर येण्याअगोदर अनेक वर्षे मधमाशी व वेगवेगळे कीटक हे पृथ्वीवर अस्तित्वात होते. मधमाश्या व वेगवेगळे कीटक त्यांच्या खाद्यासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात तसे अनेक वनस्पती वेगवेगळ्या किटकांवर परागीभवनासाठी अवलंबून आहेत. आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तु व परिस्थितीचा फायदा करून घेण्याची प्रवृत्ती मानवात आहे. गुहेमधील आदिमानवाने याच प्रवृत्तीचा वापर करून मधमाश्यांच्या वसाहतींमधून मध व मेण मिळवायला सुरवात केली. मानवाला सर्वात प्रथम माहीत असलेला गोड पदार्थ म्हणजे मध असे म्हणता येईल.

भारतात आधुनिक पद्धतीने मधमाशी पालनास सुरवात ही सुमारे ३५-४० वर्षांपूर्वी झाली. सातेरी (Apis Cerana) जातीच्या आधुनिक पद्धतीने पाळल्या जाणाऱ्या भारतीय मधमाश्यांच्या वासहतींची संख्या ७ ते ८ लाख आहे. त्यांच्यापासून वार्षिक उत्पादन होणाऱ्या मधाचे प्रमाण सरासरी एक वसाहतीमागे ३ ते ४ किलो एवढेच पडते. तज्ञांच्या अंदाजानुसार भारतातील उपलब्ध फुलोरा व नैसर्गिक साधन संपत्ति बघता सुमारे ७५ ते ८० लाखापर्यंत सातेरी मधमाश्यांच्या वसाहती भारतात तयार होऊ शकतात व त्यांचे उत्पादन सुद्धा १० किलो पर्यंत वाढू शकते.

मधमाश्या या एपिस (Apis) या जातीत मोडतात. यामध्ये ४ उपजाती आढळून येतात. युरोप मध्ये आढळणारी एपिस मेलिफेरा (Apis Mellifera), एपिस डॉरसाटा (Apis Dorsata), एपिस सेरेना (Apis Cerana), एपिस फ्लोरिया (Apis Florea). यामधील एपिस सिराना म्हणजेच सातेरी ही जात भारतात प्रामुख्याने आढळून येते.

भारतातील सातेरी मधमाश्यांच्या एक वसाहतीत एक राणीमाशी, सुमारे दहा हजार कामकरीमाश्या आणि काही थोड्या नरमाश्या असतात. या वसाहती झाडाच्या ढोलीत, अंधाऱ्या जागी मेणाच्या समांतर ७-८ पोकड्या बांधतात. या पोकड्यांमध्ये राणीने घातलेली अंडी, अळी, कोष आणि मधमाश्यांनी साठवलेला मध व पराग असतात. या संपूर्ण घटकास वसाहत म्हणतात.

  राणीमाशी : राणीमाशी ही एतर माशांपेक्षा दुप्पट मोठी असते. राणीमाशी सुमारे १५ मिमी लांब असते. वसाहतीत रोज १००० ते १५०० अंडी याप्रमाणे २ ते ३ वर्ष सतत अंडी घालणे हे महत्वाचे काम राणीमाशी करत असते. राणीमाशी फलित व अफलित अशी दोन प्रकारची अंडी घालू शकते. फलित अंड्यातून राणी किंवा कामकरी माशी जन्माला येते तर अफलित अंड्यातून नर माशी जन्माला येते. राणीमाशीचे आयुष्य २ ते ३ वर्षे असते.

  कामकरी माशी : राणीने घातलेल्या फलित अंड्यातून २१ दिवसानंतर कामकरी माशीचा जन्म होतो. अळी अवस्थेमध्ये दुय्यम दर्जाचे फक्त पराग कण व मधाचे कमी प्रमाणात अन्न दिल्याने त्यांची वाढ कमी होते. पूर्ण वाढ न झाल्यामुळे त्यांचा नारांशी संयोग होत नाही. परंतु मध, पराग गोळा करणे व वसाहतीतील इतर कामे त्या करू शकतात. कामकरी माशीचे आयुष्य ४ ते ६ महीने असते.

  नर माशी : राणीने घातलेल्या अफलित अंड्यापासून नर जन्माला येतात. अंडे घातल्यापासून २४ दिवसांनी संपूर्ण वाढ झालेले नर जन्मतात. जन्मानंतर १० ते १५ दिवसात हे नर वयात येतात. नवीन जन्मलेल्या राणीमाशीबरोबर संयोग करणे एवढे एकच काम नरांचे असते. ज्या नारांचा राणीमाशीबरोबर संयोग होतो ते संयोगानंतर मृत्यूमुखी पडतात.

मधमाश्यांपासून मध मिळतो एवढेच सर्वसामान्य माणसांना माहिती आहे. परंतु मधमाश्यांपासून मेण, पराग, विष, राजान्न हेही पदार्थ मिळतात.

अल्बर्ट आइनस्टाईन यांनी मधमाश्याबद्दल एक वाक्य सांगितले आहे ते असे की “ If the bee disappeared of the surface of the globe then man would have only 4 years of life left ” त्यामुळे मधमाशीचे महत्व फार पूर्वीपासून आहे हे दिसून येते. पण आत्ता शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या रसायनांमुळे व वृक्षतोडीमुळे मधमाश्याची संख्या खूप कमी होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मधमाशीचे संगोपन संवर्धन करणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी आपण TWJ Agro कडून मधमाशी संवर्धनासाठी प्रयत्न करणार आहोत.

प्रतीक लघाटे

Leave a Reply