आपला भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो, कारण आपल्या भारतात बहुतेक भागात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. बहुतेक कुटुंबांचा शेती आणि शेतीपूरक  किंवा शेती संबंधित क्षेत्र हा त्यांच्या उपजीविकेचा मार्ग आहे.  शहरीकरण आणि औद्योगीकरणाच्या विळख्यात सापडून शेताजमीनींचे क्षेत्र कमी होत चालले आहे  आणि त्याच्या विरुद्ध प्रमाणात वाढत्या लोकसंख्येबरोबर अन्न धान्याची मागणी वाढत जात आहे. याचा ताण उपलब्ध असलेल्या शेतजमिनीवर पडत असलेला आपण बघू शकतो. जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात किटकनाशके आणि रासायनिक  खतांचा केला जाणारा वापर, मोनो कल्चर, हायब्रिड बियाणे यासारख्या पद्धतींचा अवलंब मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातून अन्नधान्याची गरज भागावली जात असली, आर्थिक उत्पन्न मिळत असले  तरी मातीचे  पोषण मूल्य मात्र कमी होत आहे आणि हा संपूर्ण जगाला भेडसावणारा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूने विचार करता अल्पभूधारक शेतकरी जो जास्ती उत्पन्नासाठी त्याच्याकडे असलेल्या जमिनीमध्ये मोनो कल्चरची पद्धत अवलंबत असेल आणि रासायनिक खते आणि किटकनाशकांचा वापर करत असेल तर त्या शेतकऱ्यासाठी भविष्यात ही गंभीर बाब ठरू शकते. कारण कालांतराने त्याच्याकडे मुळात अल्प प्रमाणात असलेली शेतजमीन नापीक होत जाणार आहे. या सर्वांवर उपाय म्हणून आपण मिश्र शेतीचा अवलंब करू शकतो.

 

मिश्र शेती म्हणजे काय?

– एका वेळी एकाच शेतात दोन किंवा अधिक पिके आणि पीक उत्पादनासोबतच पशुपालनही करणे याला मिश्र शेती असे म्हणतात. मिश्र शेतीचा थेट संबंध पीक उत्पादन आणि पशुसंवर्धनाशी आहे. कोणत्याही एका पिकावर अवलंबून राहण्याऐवजी मिश्र शेती अवलंब करणे फायदेशीर ठरते. ही शेती पद्धती जरी प्राचीन काळापासून जगभरात वापरण्यात येत असली तरी हल्लीच्या काळात या पद्धतीचा वापर कमी झाला आहे.

 

मिश्र शेतीचे फायदे

 

१) नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्णतः  होणारे नुकसान टळते –

मिश्र शेतीतील एखादे पीक जरी अवर्षण, अतिवृष्टी, रोग अशा कोणत्याही  आपत्तीला बळी पडले तरी त्यामुळे सर्वनाश न होता त्याच शेतात वाढणाऱ्या अन्य पिकापासून व शेतीपूरक व्यवसायातून जसे की दुग्ध व्यसाय, शेळी पालन, कुक्कुटपालन इ. पासून आपणांस काहीतरी उत्पन्न निश्चितपणे मिळते.

 

२) किटकांचा प्रादुर्भाव नैसर्गिकरित्या  कमी होतो –

संपूर्ण शेतजमिनीत एकाच पद्धतीच्या पिकाची लागवड केल्यास किडिंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. याउलट मिश्र पीक पद्धतीमुळे किटकांचा प्रादुर्भाव नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते.

 

3) उपलब्ध मनुष्यबळ, पाणी, इतर नैसर्गिक साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर –

मिश्र पीक पद्धतीमध्ये बिजारोपणाचा, पिकाच्या वाढीचा, फवारणीचा, काढणीचा कालावधी वेगवेगळा असल्याने उपलब्ध मनुष्य बाळाचा पुरेपूर वापर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कारणासाठी केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे वेगवेगळी पिके एकाच क्षेत्रात असल्यामुळे त्या शेतजमिनीत उपलब्ध असणारी नैसर्गिक साधनसंपत्ती, जसे की पाणी, मातीतील पोषक घटकांचा वापर नीट होऊ शकतो.

 

४) दैनंदिन खर्चासाठी आर्थिक पाठबळ मिळते –

एकाच शेतजमिनीत वेगवेगळी पिके जसे की भाजीपाला, कमी कालावधीत उत्पन्न मिळवून देणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या  तसेच पशुपालना पासून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे अल्प भूधारक शेतकरी त्याच्या दैनंदिन खर्चासाठी पैसे कमवू शकतो.

 

५) मातीतील पोषण मूल्ये वाढते-

जनावरांकडून मिळणारे शेण व मूत्र जमिनीची सुपीकता वाढवते. त्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश असते. शेण हे पिकाच्या वाढीसाठी पोषक अन्नद्रव्य म्हणून वापरले जाते.

 

शैलेन्द्र चौघुले

समन्वयक, कृषी विभाग

Leave a Reply