रेशीम शेती उद्योग हा कृषीवर आधारीत व रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला आणि ग्रामीण भागाचा कायापालट करणारा शेतीपूरक व्यवसाय आहे. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती व हवामान या उद्योगास अत्यंत अनुकूल असून उत्पादनाची शाश्वती असणारा, तसेच सध्याच्या परिस्थितींतील शेतक-याच्या आत्महत्या रोखण्याची क्षमता असणारा हा उद्योग आहे. सद्य स्थितीत असं दिसून येते की शेतकरी फक्त पारंपरिक शेतीवर अवलंबून प्रगती करू शकणार नाही. जोपर्यंत तो शेतीसोबत जोडधंदा हे उत्पादनाचे वेगळे साधन निर्माण करणार नाही तोपर्यंत त्याची प्रगती ही मर्यादित राहील.

रेशीम उद्योगच का?

  • पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीच्या प्रकारात (पाण्याची सोय असणाऱ्या) रेशीम उद्यागाची सुरवात करता येते.
  • एकदा तुतीची लागवड केल्यानंतर तुतीपाल्याचा कीटक संगोपन करण्याकरिता १० ते १५ वर्षापर्यंत उपयोग करता येतो त्यामुळे दरवर्षी लागवड करण्याची गरज भासत नाही.
  • अल्प भांडवलाची गुंतवणूक करून दरमहा पगारासारखे उत्पन्न मिळवून देणारा हा उद्योग आहे.
  • घरातील वृद्ध, लहान मुले, स्त्रिया व अगदी दिव्यांग व्यक्तीदेखील कीटक संगोपन करू शकतात.
  • इतर बागायती पिकांपेक्षा तुतीबाग जोपासण्यासाठी १/३ पाणी लागते.
  • कच्या मालाची उपलब्धता व पक्क्या मालाच्या विक्रीची हमी देणारा हा व्यवसाय आहे.
  • एक एकर तुती लागवडीवर संगोपनाच्या वेळी किड्यांनी खाऊन शिल्लक राहिलेला तुतीपाला आणि विष्टेवर दोन दुभत्या जनावरांचे पालनपोषण होतेच तसेच दुधाच्या वाढीसही उपयोग होतो.
  • रेशीम अळ्यांच्या विष्ठेचा उपयोग बायोगॅससाठी केला जातो.
  • एक एकर रेशीम शेती मधून वार्षिक ₹ ५० ते ६५ हजार निव्वळ उत्पन्न मिळू शकते.
  • रेशीम शेती उद्योगामुळे ग्रामीण भागात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलबध होत असल्याने शहराकडे होणारे स्थलांतर रोखण्यात मदत होते.

 

रेशीम वस्त्राला देशात आणि आपल्या राज्यात प्रचंड मागणी आहे. ती मागणी दरवर्षी १६ ते २० टक्क्यांनी वाढत आहे. स्वयंरोजगार निर्मितीची प्रचंड ताकद या रेशीम शेतीत आहे. तुती लागवडीद्वारे पर्यावरणाचे रक्षण, रेशम कीटक संगोपन, धागा व वस्त्र निर्मितीं, स्वयंरोजगार निर्मिती व पर्यायाने ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारे स्थलांतर या रेशीम शेती उद्योगामुळे थांबवता येऊ शकेल. महाराष्ट्रात एक एकरातील तुती लागवडीद्वारे वर्षभरात लक्षाधीश झालेल्या शेतक-यांची नोंद आहे.

 

केवळ महाराष्ट्र, भारतात नव्हे तर पूर्ण जगात रेशीम कापडाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि दिवसेंदिवस ती वाढत चालली आहे. वाढत्या मागणीमुळे भारतात एके दिवशी पुरवठाही कमी पडू शकतो. विदर्भातील ‘सिल्क आणि मिल्क‘ ही संकल्पना राबवल्यास एका एकरातील तुती लागवडीपासून दर महिन्याला कोष विक्री पासून मिळणारा पैसा व एका गायीपासून मिळणाऱ्या दुधाचा दररोजचा पैसा, यामुळे अर्थिक समृध्दी नक्की होऊ शकते. त्याचप्रमाणे तुतीच्या फांद्या व पाला हे दुधाळ जनावरांना खाद्य म्हणून दिल्यामुळे नेहमीच्या खाद्यातील 30% बचत होऊ शकते.

 

          तुती लागवड केलेले क्षेत्र आणि मागे तुतीच्याच झाडांच्या सावलीत उभारलेली शेड.

 

तुती लागवडीकरीता आणि कीटक संगोपन करण्याकरिता 25°c ते 30°c  हे तापमान उत्तम ठरते आणि 750 मिली ते 1000 मिली पावसाची नोंद असलेल्या प्रदेशात तुतीची वाढ चांगल्या प्रकारे दिसून येते. कीटक संगोपन करताना त्यांना आर्द्रता ही 60 ते 85 दरम्यान असणे गरजेचे आहे.

 

या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्रातील विदर्भ,  मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या विभागात तुती लागवड व कीटक संगोपन उत्तमरित्या होऊ शकते. एकंदरीत मराठवाडा, विदर्भ या विभागांसाठी ही एक संधीच म्हणायला हरकत नाही.

तुती लागवड

   तुती यातील नावात आहे तु आणि ती म्हणजे रेशीम शेती करीता कमीत कमी मनुष्यबळ लागत हे आपल्याला या नावातच दिसून येत. एकदा लागवड केल्यानंतर तुती चे रोप 15 वर्षापर्यंत टिकते, त्याला कोणते हानिकारक रोग पण उद्भवत नाही, काही बुरशीजन्य रोग नियंत्रण केले की तुती बाग आणखी कोणत्या रोगाला सहसा बळी पडत नाही. तुतीच्या बागेला जैविक खते व बुरशीनाशके यांचा वापर केला तर आणखीनच फायद्याचे ठरते.

तुती बागेला कोणत्याही रासायनीक कीटकनाशकांचा किंवा इतर रासायनीक औषधांचा वापर करू नये. केल्यास याच औषधांचा काही अंश त्याच तुतीच्या पानात, झाडात  उतरतो आणि तेच जेव्हां आपण कीटकांना खायला देतो त्यामूळे त्यांची बॅचच मरून जाऊ शकते.  ही खूप गंभीर बाब असून यावर दुर्लक्ष करून चालणार नाही.

तुती लागवड केलेल्या क्षेत्रात आधी घेतलेल्या पिकांमध्ये वापरलेल्या अतिशयोक्तीपूर्ण रासायनीक औषधांचा अंश आढळून येतो. त्यापैकी काही अंश पुढील पिकात ही उतरतो. अशा वेळेस लागवड केलेल्या तुतीला आधी वापरलेल्या औषधाची बाधा होऊ नये याकरिता शक्यतो जमीन अशी निवडावी ज्यामधे जास्त प्रमाणात अतीघातक औषधे किंवा कीटकनाशके, तणनाशके वापरलेली नसावीत आणि असेलच तर त्या जमिनीमध्ये सेंद्रिय खते जसे की गांडूळ खत, कंपोस्ट खत, शेण खत यांचा वापर करावा. तुती लागवड केल्यानंतर प्रत्येक महिन्यात एकदा जीवामृत, waste decomposer अशा जैविक द्रवणाचा वापर नियमित करावा.

 

    उत्पादन क्षमता

         एक एकर क्षेत्रावर लागवड केलेल्या तुती बागेवर 100 ते 150 अंडीपुंज जगू शकतात. 100 अंडीपुंजापासून 80 ते 90 किलो कोश निर्मिति होऊ शकते. एका वर्षात एक एकर क्षेत्रातून 3 ते 4 वेळा कटाई करुन आपण बॅचेस घेऊ शकतो. एकंदरीत वर्षभर टप्पे पाडून जर तुती लागवड केली तर पूर्ण वर्षभरात 8 ते 10 बॅचेस घेऊ शकतो.  त्यामूळे रेशीम शेती उत्पादन क्षमता बघता उत्तम व्यवसाय ठरत आहे.

 

 

बाजारभाव व बाजारपेठ

देशात रेशीम उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी ६ ते ७ हजार मे.टन रेशीम धागा इतर देशातून आयात केला जातो. त्यावर प्रक्रिया करून पुन्हा दर्जेदार रेशमी वस्त्रे जवळजवळ शंभर देशांना निर्यात केली जातात. सन 2014-15 मध्ये देशातून रु. 2829.87 कोटीची वस्त्रे निर्यात करण्यात आली. (ड़िजीसीआयएस, कलकत्ता, एप्रिल-2015) यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक रेशम धागे, वस्त्रे, रेडिमेड गारमेंटस, सिल्क कार्पेटस आणि रेशीम वेस्टचा समावेश होतो. रेशीम वस्त्राला देशात आणि आपल्या राज्यात प्रचंड मागणी आहे. ती मागणी दरवर्षी 16 ते 20 टक्क्यांनी वाढत आहे.

राज्यातील जालना, औरंगाबाद, पुणे येथील बाजारेठेत प्रचंड मागणी आहे. 1 किलो रेशीम हे 800 ते 900 रूपये किलोपर्यंत खरेदी केले जाते. विदर्भातील अमरावती, नागपूर येथे सुध्दा आता बाजारपेठेची उपलब्धता झाली आहे.

 

शासकीय मदत आणि प्रोत्साहन

शासनाकडून एक एकर क्षेत्रासाठी बेणे/रोपे सवलतीच्या दरात पुरविले जाते. लागवड केलेल्या शेतकऱ्यांना लागवडीपासून कीटकसंगोपनापर्यंत पूर्ण प्रशिक्षण विद्यावेतनासह दिले जाते. रेशीम अंडीपुंज सवलतीच्या दरात पुरविली जातात. शेतक-यांनी तयार केलेले कोष हे वाजवीदराने खरेदी करण्यात येतात किंवा खाजगी बाजारपेठेत वाढीव दराने विक्री करता येते. तांत्रिक मार्गदर्शन वेळोवेळी केले जाते. मनरेगा योजनेंतर्गत प्रति एकर अनुदान दिले जाते. उद्योग करण्यासाठी शेतक-यांना बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी बँकेला शिफारस करण्यात येते. ठिबक सिंचन संच शेतक-यांना सबसिडीवर दिले जातात. कीटक संगोपनगृह बांधणीसाठी अनुदान दिले जाते.

शेड मध्ये तयार झालेले कोष

एकूणच आपण जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत हा जोडधंदा पोहोचवला पाहिजे कारण हा उद्योग म्हणजे खऱ्या अर्थाने संजीवनीच आहे.

शुभम पंचभाई

Leave a Reply