आज जरी भारत कृषि उत्पादनात जगात द्वितीय क्रमांकावर असला तरी भारतातील 42 टक्के जनता आज शेतीवर अवलंबून आहे. जर आपण बघितले 1950 मध्ये 70 टक्के जनता कृषि क्षेत्रावर अवलंबून होती आणि जीडिपी मध्ये कृषि क्षेत्राचा वाटा 53 टक्के होता. आज कृषि क्षेत्रातील जीडिपी चा वाटा 18 -19 टक्क्यावर असला तरी खूप जास्त लोकसंख्या अजूनसुद्धा शेतीवर अवलंबून आहे. तेच इतर देशात बघितलं तर चीनची 25 टक्के जनता शेतीवर वर अवलंबून आहे तर शेतीत प्रगत असणाऱ्या इस्राइलची फक्त 1 टक्के जनता आज शेतीवर अवलंबून आहे. जर स्वातंत्र्यानंतर बघितले तर भारत हा अन्नधान्यात स्वयंपूर्ण नव्हता त्यावेळेस मोठ्या प्रमाणात अन्नधान्य ची आयात अमेरिकेका तसेच इतर देशांकडून केली जायची. त्यावेळेस देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणे हा मुख्य उद्देश होता. त्यासाठी 1960 नंतर डॉ. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली हरीतक्रांतीची बीजे रोवली गेली, नवीन जास्त उत्पादकता असलेल्या वाणांची लागवड करण्यास सुरवात झाली तसेच गहु आणि तांदूळ ह्या पिकांना किमान आधारभूत किंमत देण्यात आली. त्यामुळे पुढील काळात अन्नधान्य उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामध्ये बघितले तर आज भारत शेती उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आला असून दूध, आंबा, पेरू, लिंबू, पपई, ताग, चना, आले ह्या कृषि उत्पादनाचे जगात सर्वात जास्त उत्पादन घेतले जाते तसेच तांदूळ, मसूर, कांदा, हिरवा वाटाणा, फुलकोबी, उस, बटाटा, गहू आणि चहा ह्यामध्ये द्वितीय क्रमांकावर आहे.
हरितक्रांतीमुळे पुढील काळात चांगले परिणाम झालेच त्याबरोबर काही त्रुटी ही दिसू लागल्या. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे शेतकरी हा स्वयंपूर्ण राहीला नाही. त्याला खते-औषधे, बियाणे आणि यंत्रे यासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागले परिणामी पिकांचा उत्पादन खर्च खूप वाढला. तसेच रासायनिक खतांच्या असंतुलीत वापरामुळे जमिनी नापीक होऊ लागल्या. तांदूळ आणि गहु ह्या पिकांची लागवड जास्त प्रमाणात होऊ लागली. त्यामुळे प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणा एक पीक पद्धतीचा वापर जास्त होऊ लागला व पिकांची फेरपालट कमी झाली याचा सुद्धा परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर पडू लागला. आज जरी गहु आणि तांदूळ याचे उत्पादन जास्त होत असले तरी दुसऱ्या बाजूला तेलबियांचे उत्पादन फार कमी आहे. त्यामुळे खाद्य तेलाची खूप मोठ्या प्रमाणात आयात करावी लागते.
भारतात आज 70 हजार कोटी रुपयांची खाद्य तेलाची आयात केली जाते. त्यात सर्वात जास्त म्हणजे 60 टक्के पाम तेल आणि इतर सुर्यफुल, सोयाबिन च्या तेलाची आयात केली जाते. ह्या पिकांचे उत्पादन भारतात घेतले जाते पण इतर देशांच्या तुलनेत उत्पादकता खूप कमी आहे. जर सुर्यफुल आणि भुईमूग यांची उत्पादकता चीन बरोबर बघितली तर सुर्यफुल प्रती हेक्टर सरासरी भारत 729 किलो आणि चीन 2600 किलो तसेच भुईमूग भारत 1182 किलो आणि चीन 3674 किलो प्रती हेक्टर एवढी उत्पादकता आहे. यामध्ये भारताची उत्पादन क्षमता चीन च्या तुलनेत खूप कमी आहे. तेच 1960 मध्ये भुईमूग उत्पादकता प्रती हेक्टर भारत 745 किलो तर चीन 850 किलो एवढी होती म्हणजे मागच्या 60 वर्षात चीन चे उत्पादन 4 पट वाढले तर भारताचे डबल सुद्धा झाले नाही. यावरून दिसून येते कि आपली उत्पादकता खूप कमी असल्यामुळे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात खाद्य तेलाची आयात करण्याची गरज भासते.
आज भारत सर्वात जास्त तांदूळ निर्यात करतो पण हे पीक खूप जास्त पाणी घेणारे आहे. एक किलो तांदूळ पिकण्यासाठी सरासरी 4000 ते 5000 ली पाणी लागते. म्हणजे एक किलो साठी एक टँकर पाणी आणि दुसऱ्या बाजूला अनेक जिल्हे दुष्काळणे हैराण होऊ लागले आहे. यासाठी आपण अश्या पिकांना तेल बियांचा लागवडीचा पर्याय देऊन त्यातून शेतकाऱ्याचे आर्थिक उत्पादन कसे वाढेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदे होतीलच जसे कि पाण्याची मोठी बचत आणि पिकांची फेरपालट जेणेकरून पंजाब हरियाणा ह्या भागात गहु आणि तांदूळ या पिकांची साखळी तोडून तेलबियांची लागवड केली तर त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल आणि भारत सुद्धा तेलबियांमद्धे स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल.
त्याचबरोबर फळभाज्या कांदा व बटाटा ह्या पिकांमध्ये उत्पादन जास्त असले तरी पिकाची उत्पादकता खूप कमी आहे. कांदा पिकाची उत्पादकता बघितली तर भारताची 16 टन प्रती हेक्टर, अमेरिका 56.26 टन/हे, चीन 21.9 टन/हे, आणि ब्राजील 28.8 टन/हे एवढी आहे. जवळजवळ इतर फळभाज्यांची सुद्धा अशीच उत्पादकता आहे. यासाठी नवीन संशोधीत जास्त उत्पादकता असणारे वाण विकसित करणे गरजेचे आहे तसेच संशोधीत केलेले बीटी वाण यांना मान्यता देणे गरजेचे आहे जेणेकरून संशोधकाना संशोधन करण्यास चालना मिळेल त्याचबरोबर पिकाच्या उत्पादकतेमद्धे सुद्धा वाढ होईल. संशोधनाला चालना देण्यासाठी आज भारत सरकारचे शेती संशोधनाचे बजेट फक्त 8,513 हजार कोटी आहे ते शेती गरजेपेक्षा खूप तुटपुंजा आहे. कारण संशोधनावर काम करूनच भारत आपली उत्पादकता वाढवू शकतो. तेव्हाच आपण तेलबियात स्वयंपूर्ण होऊ शकतो तसेच उत्पादनबरोबर जागतिक कृषि माल निर्यातीत वरच्या स्थानावर जाऊ शकतो.
वृषभ मांडवे