The Social Reforms

सेवाभाव

सुमंत नारायणराव ठाकरे हे राहणार उदय नगर, नागपूरचे असून त्यांचे शिक्षण बी. कॉम पूर्ण झाले आहे. त्यांनी कॉलेजला पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतले. परंतु जॉब आणि कॉलेज, लग्न झाल्यानंतर करणे त्यांना शक्य झालं नाही आणि त्यांचे पुढील शिक्षण तिथेच थांबलं. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या शिक्षणासाठी कधी कशाची कमी पडू दिली नाही. पण ते शिक्षणात सुरुवातीपासनूच मागे राहिले. त्यामुळे घरचे म्हणायचे “तू आयुष्यात कधीच काही करू शकणार नाहीस.” 

स्वतः पुरता खर्च भागेल असा जॉब करत असतानाच सुमंत प्रेमात पडले आणि २०१२ साली त्यांचा प्रेम विवाह झाला. तो प्रसंग फारच वेगळा. सुमंत घरात आई-बाबांसोबत राहतात. आई गृहिणी तर वडील शासकीय रुग्णालयात कर्मचारी होते. त्यांचे वडील रोज कोणत्या ना कोणत्या रुग्णाची मदत करायचे हे सुमंत लहानपणापासून बघत आले. कदाचित तेच रक्त त्यांच्यात उतरलं अस म्हणायला हरकत नाही. 

२०१२ ते २०१६ याच कालावधीत जॉब सुरू असतानाच एका ढोल ताशा पथकात सुमंत सहभागी झाले. त्यात सहभागी होण्याचे मुख्य कारण की पथकाच्या माध्यमाने समाजकार्य करण्याची संधी मिळत असे. २०१६ ला फेसबुकच्या माध्यमाने एका पुण्याच्या संस्थेला ते जोडले गेले. ती संस्था रस्त्यावरील बेवारस मानसिक रुग्णांसाठी काम करायची. ते काम बघितल्यावर त्यांच्या लक्षात आले की आपण समाजात वावरत असताना आपल्या सभोवताली अशी बरीच लोक आहेत, ज्यांना एक छोटीशी मदत केल्याने त्यांचे आयुष्य बदलू शकते. सुमंत ह्यांनी त्या संस्थेला संपर्क केला आणि त्या संस्थेच्या नावाखाली नागपूरला बेवारस मानसिक रुग्ण व निराधार व्यक्तींना आधार देण्याचे काम ते करू लागले. हे काम जॉब सांभाळून ते पार्ट टाईम करत होते, परंतु संस्थेचे काम नागपुरात मोठ्या प्रमाणावर वाढत गेले. त्यामुळे संस्थेने घेतलेल्या निर्णयाला सहमती देऊन सुमंत ते पार्ट टाईम चालू काम सोडून कालांतराने फुल टाईम करू लागले. त्याचा मोबदला म्हणून संस्थेने त्यांना मानधन देण्याचे ठरवले होते.  

त्याच विश्वासाने आणि आवडीने त्यांनी २०१६ ते २०१९ या कालावधीत अंदाजे १०० ते १५० रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस मानसिक रुग्ण, निराधार व्यक्तींना आधार देण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवले. परंतु संस्थेने दिलेल्या विश्वासाला तडा दिला आणि बेवारस निराधारांना आधार देता देता ते स्वतः बेवारस कसे झाले ते त्यांचे त्यांनाच कळले नाही.

 नोकरी नाही, ज्या वयात त्यांनी त्यांच्या आई-वडीलांना सांभाळायचे त्यावेळी ते, त्यांची पत्नी आणि मुलं आई-वडीलांच्या भरवशावर जगत आले. अत्यंत कर्जबाजारी होऊन, कोरोना काळात आत्महत्या करायची वेळ त्यांच्यावर आली. ते म्हणतात ना “कर्म कर फल की चिंता मत कर” अगदी तसेच त्यांच्या बाबतीत घडले. दुसऱ्यांदा त्यांना कोरोना झाला त्यावेळी देवाने का त्यांना वाचवले असावे ते सुमंत ह्यांना तेव्हा कळले नाही. परंतु कोरोनातून बरे झाले आणि कसा तरी जॉब सुरू झाला. नेमका पगार होता त्याच्या दुपटीने कर्जाचे हप्ते महिन्याला भरावे लागत. जॉब करून पण परिस्थिती कायम तीच. ते म्हणतात की…  “त्याच दरम्यान समीर सर माझ्या आयुष्यात देवासारखे धावून आले आणि त्यांनी सुमंत ह्यांना प्रसन्न सरांचा नंबर दिला. प्रसन्न सरांशी फोन वर बोलणे झाले आणि पुन्हा थांबलेले काम सुरू करण्याची खूप मोठी संधी मिळाली. ३० डिसेंबर २०२१ पासून TWJ फाउंडेशन, द सोशल रिफॉर्म्स या सामाजिक संस्थेत दाखल झाले.” 

सुमंत ह्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात मे २०२२ पासून नव्याने कामाला सुरुवात केली. आता पर्यंत १० बेवारस मानसिक रुग्णांना, ५ कौटुंबिक मानसिक रुग्णांना व २ बेवारस निराधारांना संस्थेच्या माध्यमाने आधार देण्यात त्यांना यश आले आहे. काम सुरू केल्याबरोबर प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरीच्या अभ्यागत समितीमध्ये द सोशल रिफॉर्म्स ह्या संस्थेच्या नावाची नोंद झाली, हे काम सुरू केल्याबरोबरचे संस्थेला मिळालेले पहिले यश आहे. तसेच दिनांक २८ जुलै २०२२ ची अभ्यागत समितीची पहिली बैठक होती, त्या बैठकीला सुमंत हजर होते. त्यावेळी संस्था म्हणून त्यांना ३ वर्षापासून मनोरुग्णालयात बऱ्या झालेल्या मानसिक रुग्ण महिलेच्या आईचा पत्ता शोधण्याचे आदेश देण्यात आले.

अभ्यागत समितीच्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्या मानसिक रुग्ण महिलेच्या आईचा नुसता पत्ताच शोधून काढला नाही तर त्या आईला योग्य ते मार्गदर्शन करून त्या मानसिक रुग्ण महिलेला तिचे हक्काचे घर मिळवून देण्यात मदत केली. बरेच मानसिक रुग्ण परराज्यातील असतात. त्यांची भाषा अनोळखी असते, बऱ्याचवेळा त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीमुळे त्यांना नीटसं आठवत देखील नसतं. असे बरेच प्रश्न हाताळून ही प्रक्रिया पार पाडली जाते. एखाद्या बेघर किंवा ज्यांचे कुटुंब त्यांना स्वीकारण्यास तयार नसेल अशा व्यक्तींची सोय निराधार व्यक्तींसाठी कार्यरत असलेल्या संस्थांमध्ये केली जाते. 

कित्येक मानसिक रुग्ण किती वर्षापासून असे बेवारस, असहाय्यपणे भटकत असतील हे त्यांचे त्यांनाही आठवत नसेल. सुमंत म्हणतात की अशाच एका मानसिक रुग्णाला मनोरुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना त्याच परिसरातील एक चहा विक्रेत्याची प्रतिक्रिया इथे नमूद करावीशी वाटते. आम्ही त्या मानसिक रुग्णाला तिथून नेत असताना तो म्हणाला, “गेली चार वर्ष इथे याला आम्ही सगळे पाहतोय. एक दिवस लागला असता त्याला मनोरुग्णालयात दाखल करायला पण आम्हाला ही बुध्दी झाली नाही.” हे बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. “समाजाच्या मानसिकतेत बदल होतोय, लोक या मानसिक रुग्णांच्या बाजूने विचार करायला लागले आहेत यात आमचे कार्य काही अंशाने सफल होत आहे असे म्हणता येईल,” असे सुमंत सांगतात. असे किती मानसिक रुग्ण समाजात असतील, त्यांच्या सुटकेसाठी आम्ही सर्व ठिकाणी पोहोचू हे अशक्य आहे. परंतु मानसिक रूग्णांविषयी, त्यांच्या पुनर्वसनाविषयी समाजाची मानसिकता जरी बदलली तरी ते कार्य वेगवेगळ्या स्तरावर सुरू राहील याची खात्री वाटते, असा विश्र्वास सुमंत दाखवतात.