The Social Reforms

सामाजिक कार्याचा प्रवास

प्रथमेश पोमेंडकर यांचा लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ( RSS ) संपर्क आला आणि समाजासाठी काही व्यक्ती कशा पद्धतीने आपले योगदान देतात याचे संस्कार त्यांच्यावर होऊ लागले. या संस्कारातून समाजासाठी आपण देखील योगदान दिले पाहिजे असे त्यांच्या बालमनाशी पक्के झाले आणि त्यांचा समाजाशी संपर्क झाला. महाविद्यालयीन काळात राष्ट्रीय सेवा समिती (NSS) चे व्यासपीठ त्यांना मिळाले. या व्यासपीठामुळे RSS च्या बाहेर जाऊन समाजासाठी कार्य करण्याची संधी देखील त्यांना तिथेच मिळाली. शिक्षण पूर्ण झाल्यावर २०१५ ला आयुष्यातील पहिली नोकरी ही CFI या शैक्षणिक सामाजिक संस्थेत त्यांना मिळाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबातील मुलांना दत्तक घेऊन त्यांच्यासाठी शैक्षणिक मदत करून त्यांची प्रगती करणे अशा कार्याची संधी त्यांना मिळाली. २०१७ मध्ये याच कामाचा अनुभव लक्षात घेता अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) या सामाजिक संस्थेचे कार्य करण्याची नामी संधी देखील त्यांना मिळाली आणि त्यामुळेच समाजाच्या वेगवेगळ्या समस्यांवरती त्यांना कार्य करता आले.

समाजाच्या आर्थिक विकासासाठी शासन अनेक योजना सुरू करत असते परंतु या योजना गरजू घटकांपर्यंत पोहोचत नाहीत. या योजना तळागाळातील गरजू व्यक्ती पर्यंत पोहोचविणे आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे या महत्त्वाच्या विषयावर अनुलोम संस्थेमध्ये त्यांना कार्य करायला मिळाले. “सरकारी प्रयत्नांना जनसहभागाची साथ” या ब्रीद वाक्यावर शासकीय अधिकारी यांच्याशी मैत्री करून अंदाचे २५० प्रकारच्या शासकीय योजनांची जनजागृती तसेच अंमलबजावणी करण्यात आली आणि जवळपास २००० व्यक्तींना प्रत्यक्ष शासकीय योजनांचा लाभ देण्याचे यश त्यांना मिळाले. समाजातील काही संस्थांचे सहकार्य घेऊन पाणी, आरोग्य, महिला बचतगट व उद्यमता या विषयावर देखील त्यांनी काम केले. 

डिसेंबर २०२१ मध्ये प्रसन्न करंदीकर सर यांच्याशी त्यांचा संपर्क झाला आणि पूर्व कामाच्या अनुभवाबद्दल प्रसन्न सर यांच्या बरोबर चर्चा करण्याची संधी त्यांना मिळाली. प्रसन्न सरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून TWJ – द सोशल रिफॉर्म्समध्ये त्यांना सहभागी करून घेऊन त्यांच्या आवडीचे कार्य करण्याची संधी दिली. संस्था आणि समाज यांना जोडणारा दुवा म्हणजे ‘जनसंपर्क’ च्या कार्याची जबाबदारी त्यांना दिली गेली. सुरुवातीला ‘नाम’ संस्थेला जोडून पाणी या विषयात कार्य सुरू झाले. शिव नदीचा गाळ काढण्यासाठी मदत TWJ-TSR ने केली तसेच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेऊन ८ वनराई बंधारेही बांधण्यात आले. TSR अंतर्गत सुरू असलेल्या वेगवेगळ्या विभागांना सहकार्य करून त्या विभागांचे कार्य वाढविणे यासाठी भावार्थ, आरोग्य, मानसिक रुग्ण सेवा, शिक्षण, शेती, पर्यावरण, अभिनय, इ. विभागांना ‘जनसंपर्काच्या माध्यमातून सहकार्य करण्यात आले. संस्था संपर्क मोहीम हाती घेऊन ४१  सामाजिक संस्थांना TSR ची ओळख करून देण्यात आली तसेच एका व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यातही त्यांना यश आले.

भविष्यात TWJ – TSR अंतर्गत शासकीय योजना या विषयावर काम केले जाणार आहे. या कामातूनच TWJ – TSR मधील सर्व विभागांना समाजात पोहोचविले जाणार आहे.